मुंबई - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -1, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प व वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 13 जाने.) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील या तिन्ही प्रकल्पाची कामे ही 80 टक्के पूर्ण झाले असून त्यानंतर निधीची कमतरता निर्माण झाल्याने ती रखडली होती. मात्र, आज मिळालेल्या मान्यतेमुळे वर्षभरात या तिन्ही प्रकल्पाची कामे पूर्ण होणार आहेत. अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
यामध्ये उर्ध्व तापी टप्पा-1, (हतनूर प्रकल्प) या सिंचन प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 536.01 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्पास दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 968.97 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेच्या प्रकल्पास पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 861.11 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
हेही वाचा -राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, मंत्रिमंडळात निर्णय
हेही वाचा - सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर