जळगाव - नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय रिझर्व्ह बँकेने जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिझर्व्ह बँकेने जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे मुंबईतील पंजाब बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे हजारो ठेवीदार अडचणीत आले. या कारवाईला काही दिवस उलटल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता राज्यातील अजून दोन सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली. यामध्ये जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह पुण्यातील जनता सहकारी बँकेचा समावेश आहे.
बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असून, आजवर बँक ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरल्याचा दावा बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी केला आहे. तसेच भविष्यात देखील बँक आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असून केवळ तांत्रिक कारणास्तव रिझर्व्ह बँकेने संबंधित दंडात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारची कारवाई देशातील अनेक नामांकित वित्तीय संस्था तसेच बँकांवर झाली आहे, असे स्पष्टीकरण बँकेच्या वतीने देण्यात आले आहे.