जळगाव - गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत काहीही घडलेले नाही. लोकांना सांगता येईल, असा कोणताही मुद्दा सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ३७० कलमाच्या माध्यमातून लोकांच्या भावनेला हात घालण्याचे काम सत्ताधारी भाजप करत आहे, अशी टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात केली.
विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेत पवारांनी जळगाव जिल्ह्यातील विकासाची सद्यस्थिती, भाजप सरकारची पाच वर्षातील कामगिरी अशा विविध मुद्यांवर मते मांडली. पवार पुढे म्हणाले, कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाला सभागृहात दोन सदस्य सोडले तर सर्व पक्षीयांनी पाठींबा दिला. ज्या दोघांनी विरोध केला ते काश्मिरी होते. उर्वरित सर्व सदस्यांनी या निर्णयाला पाठींबा देऊन तो एकमताने पारित केला. असे असताना सत्ताधारी भाजप पुन्हा पुन्हा तोच मुद्दा मांडत असल्याने लोकांना आता त्याचे महत्त्व तसेच गांभीर्य वाटत नाही. आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे घसरते दर, वाढती महागाई, युवकांची बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था असे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत काहीही घडले नाही, त्यामुळे ३७० कलमाचा भाजपकडून होणारा पुनरुच्चार म्हणजे, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नसल्याने लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न आहे, असे पवार म्हणाले.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 100 उमेदवार रिंगणात
उद्या महाराष्ट्र आणि हरियाणात सत्तांतर होऊ शकते
लोकसभेची निवडणूक वेगळ्या मुद्यांवर झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून त्याची प्रामुख्याने मांडणी केली. ज्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा लोक वेगळ्या विचाराने जातात. त्याचाच लाभ लोकसभेत सत्ताधाऱ्यांना झाला. मात्र, नंतर लोकांच्या लक्षात आले की या मुद्यांमध्ये काहीही तथ्य नाही. म्हणूनच लोकसभेनंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला लोकांनी नाकारले. त्याठिकाणी वेगळे चित्र राहिले. आता कशाची गरज आहे, काय बदल घडवला पाहिजे, हे आता महाराष्ट्र आणि हरियाणातील लोकांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे उद्या महाराष्ट्र आणि हरियाणात सत्तांतर झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही पवारांनी यावेळी सांगितले.
सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचे खंडन
आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचे देखील शरद पवारांनी खंडन केले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही एकत्र काम करत आहोत. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या संदर्भात माहिती सांगू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, एवढंच मी सांगू शकेल, असे स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - भुसावळमधील सामूहिक हत्याकांडाला राजकीय पूर्ववैमनस्याची किनार
संजय काकडेंच्या वक्तव्याची उडवली खिल्ली
राज्यसभेवर प्रतिनिधी पाठवता येईल, एवढे संख्याबळ देखील राष्ट्रवादी काँग्रेसला गाठता येणार नाही, असे वक्तव्य करणारे पुण्याचे माजी खासदार संजय काकडे यांची शरद पवारांनी चांगलीच खिल्ली उडवली. संजय काकडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता पवारांनी कोण संजय काकडे? कोण आहेत ते? मला पुण्याचे एक बेजार काकडे माहिती आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय का? असे सांगत पवारांनी पुढे बोलणे टाळले.