जळगाव - मी राष्ट्रवादीसोबत आहे. राष्ट्रवादी पण अजित पवारांसोबत सोबत आहे. काल (शुक्रवारी) सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याचा राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचा मूड होता. परंतु, काँग्रेसने जो घोळ घातला, त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा रात्री दीड वाजता निर्णय घेतला, असा धक्कादायक खुलासा अंमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा - या सगळ्या धक्कादायक घडामोडी; एकनाथ शिंदे सत्तास्थापनेपासून अनभिज्ञ
अनिल पाटील हे अजित पवार यांच्या शपथेच्या कार्यक्रमात उपस्थित होते. आणि ते अजित पवार यांच्या गटात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडींबाबत अजित पवारांच्या संपर्कात असलेले आमदार अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचा सत्तेत जाणाच्या निर्णय होता. काल (शुक्रवारी) तीन पक्षांची बैठक झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, काँग्रेसच्या मागण्या वाढतच होत्या. यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्णय झालाच नाही. राष्ट्रवादीचे सर्व आमदार याला कंटाळले होते. काँग्रेसचा जर निर्णय झाला नसता; तर शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्री उशिरा अजित पवारांशी चर्चा करून आमदारांनी हा निर्णय घेतला.
पाटील म्हणाले, सकाळी (शनिवारी) 7 वाजता 15 आमदार राज्यपालांसमोर उपस्थित होते. आणखी 22 आमदारही येत आहेत असा खुलासा त्यांनी केला. मी सुध्दा अजित पवारांसोबत आहे. मी निर्णय घेतला आहे. नशीब नेईल, तिकडे मी जाईन. आपण राष्ट्रवादीसोबत आहोत. आम्ही सर्व आमदार सोबत आहोतच, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'महाराष्ट्रात लोकशाहीचा खून, तिघे मिळून सरकारचा पराभव करणार'