जळगाव - दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्या दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढणार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष जैन यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी भाजपकडून रक्षा खडसेंना पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले आहे. या मतदारसंघातून भाजपकडून रक्षा खडसेंसोबत विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे, अजय भोळे देखील इच्छुक होते. भाजपने पहिल्या यादीत रावेरमधील उमेदवार जाहीर केला असला तरी जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे जळगावातील उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे.
जळगावचा सस्पेन्स कायम -
जिल्ह्यात राजकीय दृष्टीने जळगाव लोकसभा मतदारसंघ खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघात कोणाला संधी दिली जाते, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, भाजपने पहिल्या यादीत जळगावला वगळून या जागेबाबत उत्सुकता ताणून धरली आहे. या मतदारसंघात भाजपकडून इच्छूक असलेल्यांची यादी मोठी आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा देखील उमेदवाराचे नाव निश्चित करताना कस लागत आहे. याठिकाणी विधानपरिषद आमदार स्मिता वाघ, विद्यमान खासदार ए. टी. पाटील, अभियंता प्रकाश पाटील, आमदार उन्मेष पाटील, माजी खासदार एम. के. पाटील यांची नावे चर्चेत आहेत.