जळगाव - भाजपाच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची माहिती मला काल सायंकाळी झाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. हा प्रकार भाजपाकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार रक्षा खडसेंनी आज सकाळी जळगावात दिली. रक्षा खडसे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत आपले मत मांडले.
काय म्हणाल्या रक्षा खडसे?
भाजपाच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपाकडून झालेला नाही. माझ्याकडे व्हाट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रिनशॉट आलेत. त्यात हा प्रकार 'सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी' म्हणून असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकारची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरू आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
भाजपाच्या संकेतस्थळावर कोणत्याही प्रकारची गडबड नाही-
हा प्रकार मला कळाल्यानंतर मी रात्री 10 वाजेच्या सुमारास भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहणी केली. तेव्हा मला कोणत्याही प्रकारची गडबड आढळली नाही. त्यामुळे कुणीतरी भाजपाच्या संकेतस्थळाचे स्क्रिनशॉट घेऊन नंतर त्यावर एडिटिंग करून हा प्रकार केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात सारा प्रकार समोर येईलच, असा विश्वास त्यांनी वर्तवला.
अशा माहिती फॉरवर्ड करणे योग्य नाही -
घडलेला प्रकार हा नजरचुकीने झाला आहे की जाणीवपूर्वक झाला आहे, हे चौकशीत स्पष्ट होईल. पण एखाद्या महिलेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर अशा गोष्टीला सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. या साऱ्या प्रकारामुळे मला दुःख झाले आहे, असे मतही खासदार रक्षा खडसेंनी मांडले.