जळगाव - तापीतीरावरील श्रीक्षेत्र मेहूण येथून आदिशक्ती संत मुक्ताई यांच्याकडून आपल्या तीनही भावंडांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला राखी पाठविण्यात आली. श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्रीक्षेत्र सासवड अशा तीनही ठिकाणी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी पाठविण्यात येवून भावंडांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
रक्षाबंधनाचा सण हा बहीण आणि भाऊ यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करतो. रक्षाबंधनानिमित्त आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून आपली भावंड संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांना प्रेमाची राखी पाठविण्यात आली. मुक्ताईंचे बंधूप्रेम सर्वश्रुत आहे. हेच बंधूप्रेम सातशे वर्षानंतरही जपण्याचे काम रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर केले जात आहे. यंदाही विश्वस्त ह.भ.प. शारंगधर महाराज यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरोनाचा काळ असतानाही भागवत चौधरी, अनंत महाजन व गजानन कुळकर्णी यांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि श्रीक्षेत्र सासवड येथे श्रीसंत सोपानदेव महाराज यांना राखी अर्पण केली. सासवड येथे पुजारी गोस्वामी व शिंदे तर आळंदी येथे भीमाशंकर वाघमारे उपस्थित होते.
याबाबत ह.भ.प. शारंगधर महाराज म्हणाले की, संत मुक्ताई व ज्ञानेश्वर यांचे भाऊ-बहिणीचे नाते संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. रक्षाबंधनाच्या माध्यमातून भाऊ-बहिणीतील प्रेमाचे अतूट बंधन जोपासण्याचे काम करण्यात येत आहे. ही परंपरा यापुढेही निरंतर सुरू ठेवण्यात येणार आहे. अध्यात्माची परमोच्च पातळी असलेल्या बहीण-भावाच्या प्रेमाची आठवण आजही रक्षाबंधनाच्या माध्यमातून जोपासली जात आहे. राखी पाठवून आजही संत मुक्ताई आपल्या तीनही दादांना राखी पाठवत असल्याची परंपरा उल्लेखनीय आहे, असे शारंगधर महाराज यांनी सांगितले.