जळगाव - वाराणसी-मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या जबलपूरच्या युवकाची बॅग चुकून अन्य प्रवाशाने भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरताना सोबत नेली. याच बॅगेत हवाला व्यवहारातील ४० लाख रुपये होते. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करताना ही रोकड जप्त केली आहे.
वाराणसी-मुंबई एक्स्प्रेसच्या एस-४ डब्यातील ३३ नंबरच्या सीटवर राहुल गोस्वामी (वय २१, राहणार जबलपूर) हा युवक मुंबईला जात होता. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत हवाला व्यवहाराची ४० लाख रुपयांची रोकड होती. ही बॅग त्याने सीटखाली ठेवली होती. प्रवासादरम्यान गोस्वामीला झोप लागली. मनमाड येथे जाग आल्यावर बॅग जागेवर नसल्याचे त्याला समजले. त्याने डब्यातील अन्य प्रवाशांना याबाबत विचारणा केली. भुसावळला लग्नाचे वऱ्हाड गाडीतून उतरले. त्यावेळी त्यांनी चुकून बॅग सोबत नेली असावी, असा अंदाज प्रवाशांनी व्यक्त केला.
अशी सापडली ४० लाखांची बॅग
गोस्वामी याने भुसावळ जीआरपी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांना घटनेची माहिती दिली. निरीक्षक गढरी यांनी तात्काळ रेल्वे स्टेशन गाठत आरपीएफच्या सीसीटीव्ही कंट्रोल केबिनमध्ये स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमध्ये १ युवती बॅग घेऊन जाताना दिसली. संबंधित युवती रेल्वे स्टेशनबाहेर निघून ज्या वाहनात बसली, त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांनी फुटेजद्वारे मिळवला. तसेच संबंधित वाहनचालकाला बोलवून चौकशी केली. प्रवाशांना शहरातील गडकरी नगरात सोडल्याची माहिती वाहनचालकाने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस गडकरी नगरात निर्मल सत्यनारायण पिल्ले यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या घरात तपासणी केल्यानंतर रोकड असलेली बॅग सापडली.
पोलिसांनी बॅगेतील ३९ लाख ९८ हजार रुपयांची रोकड जप्त केली. जीआरपीने नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देत हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवले आहे. ही रक्कम कशासाठी वापरली जात होती, याची माहिती आयकर विभागाच्या पडताळणीवरुन समोर येणार आहे.