जळगाव - रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी रेल्वे बोर्डाचे केंद्रीय पथक शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आले होते. याप्रसंगी रेल्वे प्रवाशांसह काही प्रवासी संघटनांच्या सदस्यांनी आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे पथकासमोर मांडत नाराजी व्यक्त केली. प्रवाशांच्या नाराजीचा सूर पाहून केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी अवघ्या 20 मिनिटात दौरा आटोपून जळगावातून काढता पाय घेतला.
रेल्वे बोर्डाच्या केंद्रीय प्रवासी समितीचे अध्यक्ष पी. के. कृष्णदास यांच्या नेतृत्त्वाखाली रेल्वेच्या देशभरातील 68 विभागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार, एक 7 सदस्यीय पथक केंद्रीय प्रवासी समितीचे सदस्य प्रेमेंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध विभागांची पाहणी करत आहे. दिल्लीहून आलेल्या या पथकात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू तसेच दिल्लीच्या केंद्रीय प्रवासी समितीच्या सदस्यांचा समावेश आहे.
गेल्या 4 दिवसात या पथकाने मुंबईतील बांद्रा टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा आणि कुर्ला टर्मिनसची पाहणी केली. मुंबईत सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर लाईनची पाहणी झाल्यानंतर या पथकाने शुक्रवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर भुसावळ रेल्वे जंक्शनवरील सुविधांचा आढावा घेण्यात आला. भुसावळनंतर हे पथक जळगाव स्थानकावर आले. याठिकाणी रेल्वे स्थानकावरील शौचालये, प्लॅटफॉर्म, प्रतिक्षालय, तिकीट खिडकी अशा बाबींची पडताळणी करण्यात आली.
हेही वाचा - समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
प्रवाशांशी साधला संवाद -
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पथकातील सदस्यांनी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वेकडून मिळणाऱ्या सुविधा कशा आहेत? मिळणाऱ्या सुविधा समाधानकारक आहेत का? अजून कोणत्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे? अशी विचारणा प्रवाशांना करण्यात आली. अनेक प्रवाशांनी रेल्वेतील गुन्हेगारी, आरक्षण प्रक्रियेतील दलाली, रेल्वे गाड्यांमधील अनधिकृत वेंडर्स याबाबत तक्रारी केल्या. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील रेल्वे प्रवासी समितीच्या सदस्यांनी सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, नव्याने गाड्या सुरू करण्यात याव्यात, एक्सप्रेस गाड्यांना सर्वसाधारण डब्यांची संख्या वाढवावी, अशा मागण्यांची निवेदने दिली.
हेही वाचा - राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको
सर्वेक्षणाचा अहवाल दिल्ली बोर्डाला सादर होणार -
पथकाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दिल्ली बोर्डाला सादर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांसह प्रवासी संघटनांनी सुचवलेल्या मुद्द्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन ते मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.