जळगाव - जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी, कूपनलिका तसेच इतर स्त्रोतांना भरपूर पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे. परंतु, रब्बीच्या सुरुवातीलाच महावितरण कंपनीकडून शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पाणी उपलब्ध असताना केवळ विजेअभावी शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात वार्षिक सरासरीच्या 140 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, नद्या तसेच इतर स्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. या वर्षी रब्बीचे क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता असून, सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल. जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होते. त्यातील जवळपास सव्वा ते दीड लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी होते. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने रब्बीच्या पेरणीत 50 ते 75 हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्रफळ सव्वादोन ते अडीच लाख हेक्टर असण्याची शक्यता आहे.
खरिपानंतर शेतकऱ्यांची रब्बीवर आशा-
जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला. खरीप हंगामात कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे उडीद, मूग या कडधान्य पिकांसह कापूस, मका, ज्वारी, बाजरी यासारख्या नगदी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. पाणी उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत. पण आता महावितरण कंपनी शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करत नाही. त्यामुळे शेती मशागतीच्या कामात अडचणी येत आहेत. शेतीसाठी दिवसा किमान 10 तास वीजपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आठवड्यातून तीन दिवस रात्री होतो वीजपुरवठा-
शेतीला होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना धरणगाव तालुक्यातील भोणे येथील शेतकरी चिंतामण पाटील आणि दिनेश पाटील यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून शेतीसाठी आठवड्यातून तीन दिवस रात्री वीजपुरवठा केला जातो. तो देखील सुरळीत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीसह पिकांना पाणी देण्यात खूप अडचणी येतात. शेतकरी सध्या हरभरा, गहू तसेच मका पिकाची पेरणी करत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देण्यास अडचण येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर रब्बीच्या हंगामावर परिणाम होण्याची भीती आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
जंगली श्वापदे, सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती-
शेतीला दिवसा सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते. पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेल्यावर जंगली श्वापदे तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. अनेकदा रात्री-अपरात्री विद्युत रोहित्रावरून किंवा डीपीवरून वीज पुरवठा खंडित होतो. अशा वेळी वीज पुरवठा सुरळीत करताना अपघात घडतात. अशा अपघातात काही शेतकऱ्यांना जीवाला मुकावे लागल्याचा घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी म्हणजे, जीव धोक्यात घालणे असते, असेही चिंतामण पाटील म्हणाले.
महावितरण कंपनीकडून कानावर हात-
शेतीच्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. शेतीच्या वीज पुरवठ्याबाबत राज्यस्तरावरून जो निर्णय होतो, त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होते, असे सांगून अधिकाऱ्यांनी अधिक बोलणे टाळले. दरम्यान, राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील पेंडिंग पेड कनेक्शनबाबत सौर ऊर्जा पंपांचे धोरण जाहीर केले. परंतु, या धोरणाची अंमलबजावणी होण्यास निश्चित कालावधी नसल्याने राज्य सरकारने शेतीच्या वीज पुरवठ्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - कात्रजजवळ आठ वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात; पाच जखमी
हेही वाचा -पंजाबमध्ये तब्बल ३०० वर्ष जुनं वडाचं झाड..