जळगाव - जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागांत सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. रावेर येथे ३.४ रिश्टर स्केलची नोंद नाशिकच्या मेरी येथील भूकंपमापक केंद्रावर झाली आहे. तर तापी नदी काठावरील भागात ३.४ ते ४.९ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
नाशिकपासून २४० कि.मी अंतरावर भूकंपाचे केंद्र असून या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टरस्केल इतकी आहे, अशी माहिती भूकंप आधार सामुग्री पृथक्करण कक्षाच्या शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी दिली आहे.
रावेर तालुक्यातील निंभोरा, दसनूर, खिर्डी, अजंदा, रेंभोटा, विवरे, ऐनपूर, अहिरवाडी, पाडळे, रावेर शहर, पुनखेडा, तांदलवाडी, मांगलवाडी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील उचंदा, मेळसांगवे, अंतुर्ली, पिंप्रीनांदू, नायगाव, पातोंडी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अनेक गावांमध्ये भूकंपामुळे घरातील भांडी तसेच इतर वस्तू खाली पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने अधिकृत माहिती लवकर जाहीर न केल्याने ही अफवा असल्याचे बोलले जात होते. परंतु, नंतर हा भूकंप असल्याचे निष्पन्न झाले.