जळगाव - जळगाव जिल्हा न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (वय ३५, रा. सुपारीबाग, जामनेर) यांचा चारित्र्याच्या संशयावरुन पतीने खून केला होता. याप्रकरणी त्यांचे आरोपी पती डॉ. भरत लालसिंग पाटील (वय ४२, रा. बेलखेडे ता. भुसावळ) याला जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) यांना ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयाने आज (गुरुवारी) हा निकाल दिला आहे.
काय आहे प्रकरण?
जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा १३ जानेवारी २०१९ रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. भुसावळ येथे मृत घोषित केल्यानंतर मृतदेह परस्पर बेलखेडे (ता. भुसावळ) या मुळगाव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता. तेथे विद्या राजपूत यांचा मावसभाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता, त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते. मात्र, चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या. संशयामुळे मृत विद्या यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार दुसर्या दिवशी शवविच्छेदन झाले होते. त्यात विद्या राजपूत यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता.
जामनेर पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा
याप्रकरणी १४ जानेवारी २०१९ रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी विद्या राजपूत याचे पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील या दोघांना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. जामनेर पोलिसांनी ८ एप्रिल २०१९ रोजी जामनेर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. २४ एप्रिल रोजी दोषारोप पत्र जळगाव जिल्हा न्यायालयात वर्ग झाले होते.
१४ साक्षीदारांच्या साक्ष ठरल्या महत्त्वपूर्ण
न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षी, मोबाईल सीडीआर व फॉरेन्सिक अहवाल यानुसार न्या. लाडेकर यांनी आज (गुरुवारी) निकाल दिला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.
हेही वाचा -5 हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडले