जळगाव - शहरातील विविध २० व्यापारी संकुलातील सुमारे २ हजार २०० गाळ्यांचा नूतनीकरणाचा प्रस्ताव पुन्हा लांबणीवर पडला आहे. गाळेप्रश्नी कार्यवाही करताना पालिका प्रशासन अतिशय सावध पाऊले टाकत आहे. आता पालिकेकडून राजपत्रात नमूद निकषांचा अभ्यास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. राजपत्रातील निकषांची पूर्तता केल्याशिवाय पालिका प्रशासनाकडून महासभेसमोर प्रस्ताव आणण्याची शक्यता कमीच आहे. यापूर्वी गाळे लिलावाद्वारे दिल्याचे पुरावे शाेधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्याची पडताळणी केल्यानंतरच गाळे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
गेल्या दाेन विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरलेला व्यापारी संकुलातील गाळ्यांचा विषय अद्यापही मार्गी लागलेला नाही. पालिकेतील सत्ताधारी भाजपने मध्यंतरी गाळ्यांचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पण प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने या विषयाचे घोंगडे भिजत आहे. येत्या महासभेत गाळे नूतनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा हाेणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून गाळ्यांचा नूतनीकरणाचा काेणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नजरा लावून असलेल्या गाळेधारकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पालिकेच्या संकुलातील गाळे अनेकांकडून हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे गाळ्यांचे झालेले हस्तांतरण हे वैध मार्गाने झाले की नाही याचीदेखील पालिकेकडून खात्री केली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्रुटींची पडताळणी केल्यानंतरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
प्रस्तावाच्या दृष्टीने पडताळणी सुरू -
गाळेप्रकरणी राज्य सरकारने अधिनियमात केलेली सुधारणा तसेच त्यातील मुद्द्याच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती घेतली जात आहे. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव दिला जाईल. त्यामुळे येत्या महासभेत या विषयावर धाेरणात्मक निर्णय होऊ शकत नाही, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त संताेष वाहुळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
लिलावाच्या कागदपत्रांची पडताळणी -
सरकारने कायद्यात केलेल्या सुधारणेनुसार ज्या गाळेधारकांना लिलावाद्वारे गाळे मिळाले आहेत. अशांना पुन्हा गाळे देता येणार आहेत. त्यादृष्टीने महात्मा फुले मार्केटच्या तळमजल्यावरील गाळे लिलावाने दिल्याचे काही दस्तऐवज प्रशासनाला मिळाले आहेत. त्याअनुषंगाने आणखी काही कागदपत्रांचा शाेध घेतला जात आहे. लिलावाद्वारे गाळे दिले असले तरी तेव्हाचे मूळ गाळेधारक आजही कायम आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. जर गाळा लिलावाने दिला असेल आणि त्याचा वापरकर्ता हा मूळ गाळेधारक नसेल तर त्या तरतुदीचा फायदा हाेईल की नाही असाही प्रश्न आहे.