जळगाव - कोरोना विषाणूचा सर्वत्र धुमाकूळ सुरू आहे. दररोज नवनवे रुग्ण आढळून येत असताना नागरिकांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावातील प्राथमिक शिक्षिका गीता चित्ते यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त खान्देशात गायल्या जाणाऱ्या अहिराणी बोलीभाषेतील गाण्यातून कोरोनाविषयी जनजागृती केली आहे. अहिराणी भाषेतील हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सध्या कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कविता रचत आहेत, गाणी तयार करत आहेत. याच धर्तीवर गीता चित्ते यांनीही अक्षय्य तृतीयेला गायले जाणारे 'आथानी कैरी, तथानी कैरी... कैरी झोका खाय व्ह...' या अहिराणी बोलीभाषेतील गीताचा आधार घेत कोरोनाविषयी जनजागृती केली आहे. या गीतातून त्यांनी अनेक संदेश दिले आहेत. हे गीत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. या गीतात चित्ते यांनी कोरोना किती भयंकर आजार आहे ? कोरोना होऊ नये, म्हणून कोणती खबरदारी घ्यावी ? याविषयी त्यांनी आपल्या गीतातून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
पूर्वजांचे स्मरण करून देणारा अक्षय तृतीया हा खान्देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खान्देशात या सणाला 'आखजी' म्हटले जाते. आखजीला प्रत्येक सासुरवाशीण माहेरी येते. कानुबाईच्या गीतांवर झोका खेळते. आपल्या सासरच्या तसेच माहेरच्या अनेक आठवणींना या गीतांमधून उजाळा देते. सासुरवाशीण महिलांसाठी हा सण खूप जिव्हाळ्याचा असतो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे अनेक सासुरवाशीणींना माहेरी येता आलेले नाही. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मी बोलीभाषेतील गीतातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे, असे गीता चित्ते यांनी सांगितले.