जळगाव - कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता 46 हजार 700 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सध्या सुरू असलेल्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली आहे. जळगाव सराफ बाजारात शनिवारी सोन्याचे दर जीएसटी शिवाय 46 हजार 700 रुपये तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 100 प्रतितोळा असे नोंदवण्यात आले.
हेही वाचा - धक्कादायक! जळगावातील गोकुळ स्वीट मार्टमध्ये समोस्यात आढळली पालीची शेपटी
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. दुसरीकडे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे, सोन्याची मागणी घटली आहे. स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर देखील होत असल्याने जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कमी झाले आहेत.
असा राहिला आठवडा -
जळगावच्या सराफ बाजारात सोमवारी (14 जून) सोन्याचे दर 48 हजार 345 इतके होते. त्यानंतर मंगळवारी (15 जून) सोन्याच्या दरात प्रतितोळा 253 रुपयांची वाढ झाल्याने दर 48 हजार 598 झाले होते. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 254 रुपयांनी खाली आल्याने 48 हजार 344 रुपये प्रतितोळा झाले होते. गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा 1 हजार 200 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 47 हजार 100 रुपये असे होते. 3 टक्के जीएसटीसह सोन्याचे दर 48 हजार 378 रुपये होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सराफ बाजारात आर्थिक व्यवहारांना सुरुवात होण्यापूर्वीच सोन्याचे दर पुन्हा दीडशे रुपयांनी घसरले. शुक्रवारी सोन्याचे दर 46 हजार 940 इतके नोंदवले गेले. शनिवारी देखील सोन्याचे दर पुन्हा 240 रुपयांनी खाली आल्याने 46 हजार 700 इतके झाले. 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 100 असे होते.
सराफ व्यावसायिक म्हणतात...
सोन्याच्या दरांबाबत माहिती देताना जळगावातील प्रसिद्ध आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना म्हणाले की, अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाली आहे. आपल्याकडेही लग्नसराई जवळपास आटोपली आहे. त्यामुळे, सोन्याला मागणी नाही. याच कारणामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये ज्यांची लग्ने आहेत, असे लोक सध्या सोने घेत आहेत. दर कमी झाल्याने आता गुंतवणूक करायला हरकत नाही, असेही पप्पू बाफना यांनी सांगितले.
अशी झाली आहे घसरण -
बुधवार - 254 रुपयांची घट, दर - 48 हजार 344
गुरुवार - 1200 रुपयांची घट, दर - 47 हजार 100
शुक्रवार - 160 रुपयांची घट, दर - 46 हजार 940
शनिवार - 240 रुपयांची घट, दर - 46 हजार 700
हेही वाचा - भरधाव डंपरच्या धडकेत भुसावळच्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू