जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला काल (गुरुवारी) दुपारी मान्सूनपूर्व पावसासह वादळाने अक्षरश: झोडपून काढले. या वादळात दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांतील घरे उद्ध्वस्त होऊन ग्रामस्थ बेघर झाले आहे. शिवाय शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा वादळाने आडव्या केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज (शुक्रवारी) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, भाजप खासदार रक्षा खडसे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे.
शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
जळगाव जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला तर वादळासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून गेली. तर अनेक ठिकाणी मातीची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो हेक्टरवरील कापणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मेंढोळदा गावाला सर्वाधिक फटका
मुक्ताईनगर तालुक्यात मेंढोळदा गावाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. वादळामुळे या गावातील शेकडो घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. बेघर गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेत रात्र काढली. शुक्रवारी गावात प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. उचंदा, नायगाव तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. लवकरात लवकर पंचनामे करून भरीव अशी मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी शेतकरी मागणी करत आहेत.
रावेर तालुक्यातही वादळाचे थैमान
रावेर तालुक्यातील खेर्डी, विटवा, ऐनपूर, निंबोल, सुरवाडी, वाघाडी या परिसरात वादळाने थैमान घातले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेर्डी गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वादळामुळे विजेचे पोल तसेच डेरेदार वृक्ष उन्मळून पडले. केळीच्या बागांचेही अतोनात नुकसान झाले आहे.
स्थानिक नेत्यांची पाहणीसाठी धाव
वादळाच्या दुसऱ्याच दिवशी आज, शुक्रवारी सकाळपासून मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी स्थानिक आमदार-खासदारांसह नेत्यांनी धाव घेतली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून देखील सकाळपासूनच पंचनाम्यांना सुरुवात झाली होती.
पीक विम्याचे निकष शिथिल करावे- एकनाथ खडसे
केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पीक विम्याचे जे काही निकष आहेत, ते शिथील करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे यांनी म्हटले आहे की, पीक विमा कंपन्यांनी घातलेल्या अटीनुसार त्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात यावी. जो माहिती देईल त्यालाच विमा मिळेल. ज्याची माहिती मिळणार नाही त्याला विमा मिळणार नाही. ही अट अन्यायकारक आहे. महसूल व कृषी खात्याने जे काही पंचनामे केले आहेत, ते गृहीत धरून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा. शेतात पडलेली केळीचे खोडं बाहेर काढण्यासाठीचा खर्च हा एमआरजीएस योजनेमधून करावा. तसेच ज्याप्रमाणे तौक्ते व यास वादळे झाली, त्यातील नुकसानग्रस्तांना जे निकष लावून भरीव मदत करण्यात आली, तशीच मदत या शेतकऱ्यांना देखील करावी, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून शनिवारी होणार पाहणी
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून उद्या (शनिवारी) मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजेपासून मुक्ताईनगर तालुक्यात तर दुपारी १२ वाजेपासून रावेर तालुक्यात ते पाहणी करणार आहेत.
हेही वाचा - Maratha reservation - संभाजी राजे शिवराज्याभिषेकदिनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार