जळगाव - आरएसएसने २०२४ मध्ये देशाचे संविधान बदलण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, संविधान का बदलणार, याबाबत आरएसएसने वक्तव्य केलेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की, आरएसएसला मनुवादी संविधान या देशात आणायचे आहे. त्यामुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणणे महत्वाचे आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते जळगाव येथे बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, महाआघाडीसंदर्भात चार महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबतचा अजेंडा काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही चर्चा थांबली आहे. निवडणुका लवकर असल्याने काँग्रेसने हा अजेंडा लवकर देण्याची गरज आहे. तरच बोलणी पुढे जाईल. आता आम्ही ज्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत, त्या मतदारसंघातील एकही उमेदवार मागे घेतला जाणार नाही. उरलेल्या मतदारसंघावर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.
तरच समझोता होईल-
लोकसभा निवडणुकीसाठी खूप कमी वेळ राहिला आहे. वंचित बहुजन आघाडी हा गरीब, वंचितांचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांपर्यंत जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, म्हणून काँग्रेसने हा अजेंडा लवकर द्यावा, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसने वेळेत अजेंडा दिला तरच महाआघाडीसंदर्भात समझोता होऊ शकतो, अशी भूमिकादेखील प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण बिनबुडाचे-
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण बिनबुडाचे आहे. त्यांमुळे त्यांच्याविषयी न बोललेले बरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण म्हणजे 'अवसरवादी' राजकारण आहे, असेही ते म्हणाले.