जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. एकीकडे अशी विदारक परिस्थिती असताना दुसरीकडे, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाविषयीची बेफिकिरी दर्शवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावातील जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर, त्यांच्या अंगावरील पीपीई किटची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता स्मशानभूमीतच इतरत्र फेकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीची द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ, पाचोरा आणि चोपड्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना कोरोनाचा मृत्यूदर देखील अधिक आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात एका दिवसाआड कोरोनाचा बळी जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, 2 ते 3 कर्मचारी, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह मोजके नातेवाईक यांच्या उपस्थितीत संबंधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतात. यावेळी मृतदेह हाताळणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णवाहिका चालकाला पीपीई किट परिधान करणे बंधनकारक आहे. कोरोनाग्रस्त मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधितांनी आपल्या अंगावरील पीपीई किटची देखील शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे नियमानुसार बंधनकारक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एक तर त्या पीपीई किटला जाळून टाकावे किंवा जमिनीत पुरावे, असा नियम आहे. एकदा वापरलेले पीपीई किट दुसऱ्यांदा वापरता येत नाही. मात्र, जळगावात दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीये. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनेकदा आरोग्य कर्मचारी स्मशानभूमीतच पीपीई किट फेकून निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत जळगावातील नेरीनाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीतील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
नेरीनाका स्मशानभूमीतील प्रकार-
जळगावातील नेरीनाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत दुर्लक्ष होत आहे. नेरीनाका स्मशानभूमीत दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यासाठी शेकडो नागरिक याठिकाणी येत असतात. अशावेळी कोरोनाग्रस्त मृतदेह हाताळणारे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत फेकलेल्या पीपीई किटच्या संपर्कात येऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. हा प्रकार त्वरित थांबवा, पीपीई किटची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जावी, अशी मागणी केली जात आहे.