जळगाव - शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयात झालेल्या विद्यार्थी खूनप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. किरण हटकर, अरुण सोनवणे, मयूर माळी, समीर सोनार, तुषार नारखेडे, इच्छाराम वाघोदे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी किरण अशोक हटकर (वय २०, रा. नेहरुनगर), अरुण बळीराम सोनवणे (वय २३, रा. समतानगर), मयूर अशोक माळी (वय १८, रा. महाबळ), समीर शरद सोनार (वय १९, रा. फॉरेस्ट कॉलनी) व तुषार प्रदीप नारखेडे (वय १९, रा. यशवंतनगर) या पाच जणांना रविवारी पुण्यातून अटक केली. तर इच्छाराम वाघोदे याला शनिवारी पारोळा शहरातील बसस्थानकावर अटक झाली होती. अटक केलेल्या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना रविवारी पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना पुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मुकेशचा खून केल्यानंतर काही मिनिटातच हल्लेखोरांनी जळगाव सोडले होते. सुरुवातीला ते शहरातील काव्यरत्नावली चौकात आले. तेथून काही मित्रांशी बोलणे करुन सर्वांनी मोबाईल बंद केले होते. यानंतर ते शिरसोलीमार्गे पाचोऱ्याला गेले होते. सायंकाळी ५ वाजतापासून ते पाचोरा रेल्वेस्थानकावर थांबून होते. यावेळी त्यातील काही संशयितांनी मोबाईल सुरू करुन पुन्हा जळगावातील मित्रांकडून परिस्थिती जाणून घेतली. यामुळे तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला होता. मात्र, पोलीस पोहोचण्याच्या आधीच पाचही संशयित महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याला निघून गेले होते. दरम्यान, त्यांचे लास्ट लोकेशन पाचोरा व त्यानंतर थेट पुण्याचे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून पुणे गाठले. पाचही आरोपी मित्राच्या खोलीवर थांबल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
काय आहे प्रकरण ?
शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुकेश सपकाळे (वय 23, रा. असोदा, ता. जळगाव ) या विद्यार्थ्याचा चॉपरने वार करत शनिवारी दुपारी खून झाला होता. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा होती. मात्र, दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरूनच हा प्रकार घडल्याचे आरोपींनी दिलेल्या कबुलीतून उघड झाले आहे.