जळगाव: राज्यात सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरू असताना अनेक कॉपी प्रकरण समोर येत आहेत. कुठे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यास मदत करत आहेत तर कुठे परिक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातून देखील कॉपी पुरवणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी चांगलाच लाठीमार केल्याचा व्हिडीओ समोर येत आहे.
कॉपीबहादरांना पोलिसांचा लाठीमार: राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असून जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवणाऱ्या एका कॉपी-बहादराला पोलिसांनी चांगला लाठ्यांचा प्रसाद दिला आहे. यापूर्वी कॉपी बहादरांना पोलिस लाठीमार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर काल व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या दोन कॉफी बहादराची पोलिसांनी धुलाई केल्याचा व्हिडिओ आज ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यातील कॉपी प्रकरणे: राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षेला सुरूवात झाली असून यंदाच्या बारावी परीक्षेसंदर्भातल्या अनेक कॉपी प्रकरणाच्या बातम्या समोर येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बारावीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाच्या ऐवजी उत्तर देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता आणि हिंदीच्या पेपरमध्ये चुका झाल्याचेही पुढे आले होते. तर दुसरीकडे इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कालच बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे परिक्षेआधीच गणिताचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
कॉपीमुक्त अभियानाचे काय?: काही दिवसांपूर्वीत दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयातील चक्क शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याची घटना घडली होती. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्यामुळे 9 शिक्षकांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षण विभागाकडून जरी कॉपीमुक्त अभियान राबविले जात असले तरी राज्यातील ताज्या कॉपी प्रकरणांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.