धरणगाव (जळगाव) - तालुक्यातील एका पत्रकाराला न्युमोनिया झाल्यामुळे सुमारे २५ दिवसांपूर्वी जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी या पत्रकराचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
मृत व्यक्ती ही धरणगाव शहरातील एका शाळेतील शिक्षक तथा पत्रकार होते. जळगावातील गोल्ड सिटी या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी टॉसीलीझूमॅब नावाच्या इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. मात्र, हे औषध मेडिकलमध्ये उपलब्ध झाले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या पत्रकाराला इंजेक्शन देण्यास नकार दिला होता. अखेर या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची दखल घेवून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्र दिल्यानंतर त्या पत्रकाराला शासकीय रुग्णालयातून इंजेक्शन देण्यात आले.
यानंतरही त्यांच्या प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. वेळोवेळी लागणाऱ्या औषधांसाठी त्यांच्या कुटुंबीयांची फरफट झाली. तर दुसरीकडे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. यातच शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात पैसे खर्च करुन देखील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.