जळगाव - एकीची ताकद काय असते, हे अमळनेर तालुक्यातील आनोरे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी जलसंधारणाचा ध्यास घेऊन कार्यरत असणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या कामाने प्रभावीत झालेल्या आनोरेवासीयांनीही दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला. परस्पर हेवे-दावे तसेच राजकीय जोडे बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्र आले आणि श्रमदानातून एकाच दिवशी संपूर्ण गावात घरोघरी शोषखड्डे काढले.
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या आनोरेवासीयांनी यश मिळवण्याचा निश्चय केला आहे. अमळनेर तालुक्यातील आनोरे हे गाव अवर्षणप्रवण भागात असून ग्रामस्थांना वर्षभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३५० ते ४०० लोकसंख्येच्या या गावात १०० कुटुंब आहेत. दोन-चार विहिरी वगळल्या तर गावासाठी पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. शिवाय गेल्या चार ते पाच वर्षांपासून अमळनेर तालुक्यात सतत दुष्काळ पडत असल्याने यावर्षी परिस्थिती खूपच भीषण आहे. म्हणून प्रशासनाकडून गावाला १० हजार लीटर क्षमतेच्या टँकरने दररोज पाणीपुरवठा केला जात आहे.
दुष्काळाला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी काय करता येईल, या विचारात असताना आनोरेवासीयांना पाणी फाउंडेशनच्या कामाची माहिती झाली. जलसंधारणाची कामे केल्याशिवाय दुष्काळावर मात करता येणार नाही, याची जाणीव झाल्याने सर्व ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचा निचरा जमिनीत होण्यासाठी गावात शोषखड्डे करणे बंधनकारक आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आता आनोरेवासीयांकडून गावशिवारात जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. त्यात डोंगरउतारावर समतल चर खोदणे, नाला खोलीकरण करणे, शेतबांध बंदिस्त करणे अशा कामांचा समावेश आहे.