जळगाव - प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तरूणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवारी) पाळधी (ता.धरणगाव) येथे उघडकीस आली. दरम्यान, या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्या तरुणीचा प्रियकर पतीचा देखील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत पाटील (रा. पाळधी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
पाळधी (ता. धरणगाव) गावातील आरती भोसले व प्रशांत पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही काही दिवस बेपत्ता झाले होते. ते प्रेमविवाह करून घरी परतले होते. दोघांच्या पालकांनी पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला होता. त्यानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच आरतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. घटनेच्या दिवशी प्रियकर पती प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. त्यास जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.
अवघ्या चोवीस तासातच प्रशांत याची देखील प्राणज्योत मालवली-
पाळधी गावातील आरती विजय भोसले (वय १९)आणि प्रशांत पाटील हे दोघे घरातून बेपत्ता होते. दत्त जयंतीच्या दिवशी दोघांवी मंदीरात जावून विवाह केला. यावेळी दोघांनीही देवाला साक्षीला सोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली. अर्थात जीना मरणा साथ-साथ याचीच प्रचिती पाहण्यास मिळाली. विवाहानंतर अवघ्या तीन-चार दिवसानंतर आरतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासातच प्रशांत याची देखील प्राणज्योत मालवली.
प्रकरणाचे गूढ वाढले-
आरतीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे दिसते. आता तिचा पती प्रशांत याचाही विषबाधेने मृत्यू झाला आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह पण केला. मग दोघांनी विष का घेतले असावे? हा प्रश्न आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान आहे.
हेही वाचा- अन् पोलिसाने 'त्या' वृद्ध व्यक्तीला मरणाच्या दारातून बाहेर काढलं..पाहा व्हिडिओ..