जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधील ऑक्सिजन आज (गुरुवारी) सायंकाळी साडेसात वाजेपासून पूर्णपणे संपला आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील सर्व रुग्णांना बॅकअप ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. लिक्विड ऑक्सिजनचा टँकर दाखल होण्यास उशीर झाल्याने ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, लिक्विड ऑक्सिजन टँकर लवकरच दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत असून रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
रुग्णांना सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा -
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेले २७५ कोविडग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर उपचार घेत आहेत. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक आज सायंकाळी साडेसात वाजता पूर्णपणे संपला. त्यानंतर खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी बॅकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या १०० ऑक्सिजन सिलिंडरद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर ३ तासांनी ते सिलिंडरदेखील संपले. त्यानंतर पुन्हा खासगी ऑक्सिजन पुरवठादाराकडून १०० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून घेण्यात आले. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून बॅकअप ऑक्सिजन सिलिंडर ऐवजी आणखी ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
टँकरचे लोकेशन मिळेना -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगिता गावित, ऑक्सिजन समितीचे डॉ. संदीप पटेल, संजय चौधरी यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी प्रत्येक कक्षात रुग्णांवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आल्याची माहिती मिळत आहे. परंतु, त्याचे ठोस लोकेशन मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
पहिल्यांदा पूर्ण रिकामा झाला ऑक्सिजन टॅंक -
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या स्वयंपूर्णतेसाठी २० किलोलीटर क्षमतेचा ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी हा प्लांट कार्यान्वित झाला आहे. त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच तो पूर्णपणे रिकामा झाला. लिक्विड ऑक्सिजनचा टँकर वेळेत दाखल न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे एकमेकांच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा - जळगाव : महिलेला अमानुष शिक्षा दिल्याप्रकरणी जातपंचायतीच्या पंचांविरुद्ध गुन्हा दाखल