जळगाव - एकीकडे दुष्काळापुढे राज्यातील शेतकरी हतबल होत असताना सुरेश चव्हाण हे त्याला अपवाद ठरले आहेत. बँकेच्या नोकरीतून निवृत्त झालेले सुरेश चव्हाण यांनी शेतीत एखादा नवा प्रयोग राबवावा, या विचारातून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळासारख्या प्रतिकूल परिस्थितीत वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली असतानाही त्यांनी शेतीचे सकारात्मक चित्र इतरांसमोर ठेवले आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद शिवारात सुरेश चव्हाण यांची शेती आहे. ते जळगाव जिल्हा सहकारी बँकेत शाखाधिकारी म्हणून नोकरीला होते. २ वर्ष शिल्लक असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर इतरांप्रमाणे घरी बसून आराम न करता त्यांनी पूर्णवेळ शेती करायचा निर्णय घेतला. घरी सर्व सुखसोयी असताना उतारवयात कशाला शेतीच्या भानगडीत पडता? असे म्हणत घरच्या मंडळीने त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
सुरुवातीची काही वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती केल्यावर, शेतीत एखादा नवा प्रयोग केल्यावाचून पर्याय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी आपल्या २५ एकर शेतीपैकी २० गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली. प्लॉटमध्ये रोपांच्या दोन्ही बाजूने ठिबक लावल्याने मिरचीच्या रोपांना फायदा झाला. दुष्काळी परिस्थितीतही त्यांना आतापर्यंत मिरचीचे १४ टन उत्पादन आले असून येत्या महिनाभरात दीड ते दोन टन उत्पादन अपेक्षित आहे.
चव्हाण यांनी २० गुंठे क्षेत्रात स्टेट बँकेच्या सहकार्याने उभारलेल्या पॉलीहाऊसमध्ये पुण्याच्या के.एफ. बायो कंपनीची ६ हजार रोपे लावली. त्यानंतर योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केले. त्यामुळे प्लॉटमधील प्रत्येक रोपांवर ३५० ते ४०० ग्रॅम वजनाच्या अनेक मिरच्या लागल्या आहेत. या हंगामात त्यांना सुमारे १५ ते १६ टन उत्पादन अपेक्षित असून आता बाजारात मिळणारा सरासरी दर विचारात घेतला तर त्यांना खर्चवजा अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
शेतीचे व्यवस्थापन सांभाळत असताना त्यांना पत्नी पुष्पलता यांचीही मोलाची मदत होती. उतारवयातही दोघे दररोज न चुकता शेतात जातात. कामानिमित्त सुरेश चव्हाण बाहेरगावी गेल्यानंतर पुष्पलता चव्हाण शेतीची सर्व कामे सांभाळतात. शेती कामातून मनाला समाधान मिळते, शिवाय निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येत असल्याचा आनंद आहे, असे त्या म्हणाल्या.