जळगाव - जिल्ह्यात परदेशातून आलेल्या १६० नागरिकांच्या निवासस्थानी, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान, संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात सुदैवाने एकही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत.
जिल्ह्यात 1 मार्चपासून परदेशातून प्रवास करून आलेल्या भारतीय व परदेशी नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट व पाहणीच्या आधारे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाची माहिती नियमितपणे राज्य नियंत्रण कक्ष तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली जात आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रासाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांची तर महापालिका क्षेत्रासाठी मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जळगावात 20 पथके कार्यरत-
महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करण्यासाठी 20 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 44 तर नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामीण क्षेत्रात 116 असे एकूण 160 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी देखील झाली असून त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.
मेहरूणमध्ये अडीच हजार घरांचे दररोज सर्वेक्षण-
जळगाव शहरातील मेहरूण भागातील एका 49 वर्षीय नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारी म्हणून या परिसरातील अडीच हजार घरांचे दररोज मॉनिटरिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे 14 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.