जळगाव - राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप उत्तम प्रकारे नेतृत्व करत आहेत. ते आमच्या तीनही पक्षांमध्ये भांडणे होऊच देत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला पुढची चार वर्षे विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे लागणार आहे, असा चिमटा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काढला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'ला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यशोमती ठाकूर आज (शुक्रवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने संवाद साधला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी विविध प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुलाखत राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो-राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तीनही पक्ष एकत्र आलो. परंतु, राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आम्हाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यावर बंधने आली. सुरुवातीच्या काळात आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ, औषधी अशा महत्वपूर्ण बाबींची कमतरता भासत होती. एवढंच काय सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जो 'हनिमून पिरियड' सरकारला मिळतो, तो देखील आमच्या नशिबी नव्हता. मार्चमध्ये आमचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. ते कोरोनामुळे अर्ध्यातच गुंडाळावे लागले. पण अशाही प्रतिकूल परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव यांनी राज्याची कमान व्यवस्थित सांभाळली. त्यामुळे राज्याची परिस्थिती लवकर पूर्वपदावर येण्यास मदत झाली, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
कुटुंबात भांडणे होत नसतात का? -महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे आमच्या तीनही पक्षांचे एकसंघ कुटुंब आहे. प्रत्येक कुटुंबात भांडणे होत असतात. आमचेही एक कुटुंब आहे, मग कुटुंबात भांडणे होत नसतात का? दुसरी बाब म्हणजे, आमचे कॅप्टन सर्व समजून घेतात. ते भांडणे होऊच देत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला पुढची चार वर्षे विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
राज्यासाठी अजून बरेच काही चांगले काम करायचंय-राज्यात आम्हाला अजून खूप काही चांगले काम करायचे आहे. महिला व बालविकास विभागाची भूमिका कोरोनाच्या काळात खूपच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीत वेग आणण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय आगामी काळात घेतले जातील. विशेष म्हणजे, महिला व बालहक्क आयोगाच्या बाबतीत लवकरच योग्य ते निर्णय होतील, असेही ठाकूर यांनी सांगितले.
सक्षम, सुदृढ महाराष्ट्राची निर्मिती हाच वर्षपूर्तीचा संकल्प-
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने माझा सक्षम, सुदृढ महाराष्ट्राची निर्मितीच्या अनुषंगाने प्रयत्न करणे, हाच संकल्प असल्याचेही त्या म्हणाल्या.