जळगाव - सातपुडा पर्वतरांगांमधील चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील पहाड पट्टीतील सुमारे ९५ गावांमध्ये मोबाइल टॉवर नाही. त्यामुळे शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाइल नेटवर्क नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रणेत्या प्रतिभा शिंदे यांनी बैठकीत दिली.
जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेंतर्गत येणाऱ्या यावल, रावेर व चोपडा तालुक्यातील दुर्गम व पेसा क्षेत्रातील गावांबाबत जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील, अशासकीय सदस्य प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते व इतर अधिकारी उपस्थित होते.
कर्जाने, देवझिरी, सत्रासेन, निमड्या, सहस्त्रलिंग, जामन्या हे सर्व चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील उपकेंद्र बंद असून, येथे डॉक्टर, नर्स उपलब्ध नसल्याची तक्रार गावातील लोकांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. देवझिरी येथील उपकेंद्राचे कामकाज अत्यंत निकृष्ट असून, त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील पहाड पट्टीतील जवळजवळ ९५ गावांमध्ये मोबाइल टॉवर नसल्याने शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत असल्याबद्दल शिंदे यांनी मुद्दा मांडताच जिल्हाधिकाऱ्यांनी मोबाइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नेटवर्क सुरू करण्याचे आश्वासन दिले. कुंड्यापाणी व निमड्या गावांमधील पाड्यांवर अंगणवाडी नसल्याने मुले पूरक पोषक आहार व शिक्षणापासून वंचित राहत असल्याची समस्याही मांडण्यात आली.