जामनेर (जळगाव) - जुन्या वादातून वृध्द महिलेस केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे घडली. याप्रकरणी चौघांविरूध्द पहूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृद्धेला लाथाबुक्क्यांनी मारहाण -
तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील लीलाबाई छगन तुरे (वय-70) आणि विजय गणेश तेली यांचे घराच्या मागील भागात असलेल्या गटारीवरून पूर्वी वाद झाले होते. यातूनच गुरूवारी रात्री पुन्हा एकदा वाद झाला. यावेळी विजय गणेश तेली, त्याची पत्नी रेखा विजय तेली, मुलगा आकाश आणि हर्षल या चौघांनी लिलाबाईंना लाथाबुक्क्यांनी छाती, पोट व तोंडावर बेदम मारहाण केली. तसेच मुलगा भिका छगन तुरे (वय ३०) याला देखील तुझ्या आईप्रमाणे खून करण्याची धमकी दिली.
हेही वाचा - बनावट पावती पुस्तक छापून श्रीराम मंदिराच्या नावे वर्गणी, गुन्हा दाखल
खुनाचा गुन्हा दाखल -
दरम्यान, चौघांनी केलेल्या मारहाणीत लिलाबाई छगन तुरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिका तुरे याने पहूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार तेली कुटुंबातील चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यापैकी विजय गणेश तेली व आकाश तेली यांना अटक करण्यात आली. तर रेखा तेली व हर्षल तेली हे दोघे पसार झाले आहेत. पुढील तपास डीवायएसपी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार अनिल सुरवाडे, ज्ञानेश्वर बाविस्कर हे करत आहेत.