जळगाव - ओबीसी नेत्यांमुळे पक्षाचा चेहरामोहरा बदलला आहे. ओबीसींमुळेच पक्ष आज इथपर्यंत आला. त्यामुळे ओबीसींचे नेतृत्त्व डावलून चालणारच नाही. पक्ष वाढीसाठी ओबीसी समाजाने परिश्रम घेतले आहेत, हे विसरून चालणार नाही, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना खडसे बोलत होते.
सध्या भाजपमध्ये ओबीसींना डावलले जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात विचारणा केली असता खडसे पुढे म्हणाले, ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाल्याचे मी कधीही म्हटलेले नाही. पक्षातील वागणुकीमुळे ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना निर्माण झाली आहे. मी ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली आहे. मला जातीबद्दल बोलायचे नाही. मात्र, ही बाब पक्षासमोर आणून देणे गरजेचे आहे. गोपीनाथ मुंडे असो, की इतर ओबीसी नेत्यांमुळे पक्षाचा चेहरामोहरा बदलला व पक्ष इथपर्यंत आला. त्यामुळे ओबीसींचे नेतृत्व डावलून चालणार नाही, असे स्पष्ट मत खडसे यांनी व्यक्त केले. ओबीसींनी जीवाचे रान करीत परिश्रम घेतले. त्यामुळे पक्षाला हे दिवस आले आहेत, असे सांगत त्यांनी ओबीसी समाजाच्या योगदानाची आठवण पक्षाला करून दिली.
गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचे प्रसंग -
मी देखील पक्षासाठी भरपूर 'हमाली' केली. त्याचे फळ मला मिळाले. मला पक्षाने भरपूर दिले. मात्र, माझा काही दोष नसताना मला पक्षाकडून डावलले जात आहे. दोषी असेल, तर नक्की कारवाई करा. मात्र, माझा काय दोष होता, हे पक्षाने मला सांगितले नाही. मला दूर सारले, असे सांगत त्यांनी पक्षातील कुरघोड्यांबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
माझ्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचे प्रसंग आहे. त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला का टार्गेट केले जाते? अशी शंका निर्माण होते. यात दुसऱ्याला संधी देण्यासाठी पक्ष वाढविणाऱ्यांवर अन्याय होत असेल, तर त्यांची का आरती करावी, असा संताप खडसे यांनी व्यक्त केला.