जळगाव - टाळेबंदीतही वृक्षारोपण करण्याकरता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी उत्साह दाखविला आहे. या विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या परिसरात, शेतात, माळरानात, मोकळ्या जागेत व महाविद्यालयाच्या प्रांगणात पाच तासात तब्बल 12 हजार 977 रोपांची लागवड केली आहे.
पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, सातत्याने घटणारी जैवविविधता, जमिनीची धूप, वैश्विक तापमान वाढ, अनियमित पर्जन्यमान या कारणांनी वृक्षलागवडीचे महत्त्व वाढले आहे. हे लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवकांनी वृक्षलागवडीत सहभाग घेतला.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी. पी. माहुलीकर, कुलसचिव प्रा .डॉ. बी. व्ही. पवार, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिलीप पाटील, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे आदींनी सपत्नीक वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात केली. या कृतीमधून त्यांनी प्राध्यापक व स्वयंसेवकांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांनी वृक्षलागडीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांच्याबरोबर वृक्षारोपण केले. वेळेअभावी रोपे उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी परिसरात आंबा, जांभूळ, कडुलिंब, रामफळ, सिताफळ, तुळशी आदींचे बीजारोपण केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. विजय मांटे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मीक आढावे नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांनी परिश्रम घेतले. तसेच तिन्ही जिल्ह्यांचे विभागीय रासेयोच्या समन्वयकांनी परिश्रम घेतले. उपक्रमाच्या नियोजनामध्ये विभागीय समन्वयक डॉ. प्रवीण महाले व डॉ. वैभव सबनीस यांनी तांत्रिक सहाय्य केले. प्रत्येक रोपाचे जिओ टॅगिंगद्वारे फोटो काढून नोंद करण्यात आल्याची माहिती रासेयो विभागाने दिली आहे.