जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारपासून पूर्वीप्रमाणेच कोरोनाव्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार होणार असल्याने रुग्णांची फरफट थांबणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपूर्वी हे रुग्णालय कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, तसेच नॉन कोविड रुग्णांना वेळेत चांगल्या सुविधा व उपचार मिळावेत यासाठी पुन्हा एकदा हे रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन रुग्णालय प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची पाहणी केली, व आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार आदि उपस्थित होते.
300 बेड नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी राखीव
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अद्यापही याठिकाणी 65 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. महाविद्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीत पूर्वीप्रमाणेच 300 बेड हे नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी असतील, तर 125 बेड हे कोविड रुग्णांवर उपचारासाठी ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या कालावधीत याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा व उपचार मिळणार आहेत. भविष्यात कोरोनाची परिस्थिती उद्भवली तरी त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी मिळेल कोरोनाची लस
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, शासनाकडून लस प्राप्त झाल्यानंतर लस देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.