जळगाव- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातील लोकांमध्ये कोरोना आढळून आला आहे. त्यामुळे त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. अशातच जळगाव शहरातील 10 जण या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- Coronavirus : दिलासादायक..! पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेची कोरोनावर मात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. एमआयडसी पोलिसांनी बुधवारी अशा नागरिकांचा शोध सुरू केला आहे. तबलिगी जमात परिषदेत देशभरातून तसेच परदेशातील सुमारे 2 हजार लोक सहभागी झाले होते. यातील काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तेथून आलेल्या 9 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर 411 जण पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान, हे लोक स्वत:हून समोर येत नसल्यामुळे आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
जळगाव शहरातील मेहरुण परिसरातून काही लोक दिल्लीला गेल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आहे. या लोकांनी स्वत:हून तपासणी करुन घ्यावी, रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु, कोणीही समोर येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून गोपनीय माहिती मिळवणे सुरू केले आहे. बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक सकाळपासून हद्दीत फिरुन नागरिकांबाबत माहिती घेत होते. सायंकाळपर्यंत त्यांच्या हाती काही ठोस माहिती लागली नाही. दरम्यान या नागरिकांना शोधून रुग्णालयात दाखल करण्याचे आव्हान समोर ठाकले आहे.