जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये २६७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. तर दिवसभरात १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला गुरुवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात २६७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधिक ८६ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण २३, भुसावळ ८, अमळनेर ४, चोपडा १६, पाचोरा १८, भडगाव ७, धरणगाव ९, यावल १२, एरंडोल ५, जामनेर ३४, रावेर २, पारोळा १५ , चाळीसगाव २८ असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, गुरुवारी मुक्ताईनगर व बोदवड येथे एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
एकूण २६७ पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारी नव्याने समोर आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सद्यस्थितीत १० हजार ८५८ इतकी झाली आहे. त्यातील ७ हजार २८७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गुरुवारी २७१ जणांना डिस्चार्ज मिळाला. तर, ३ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी दिवसभरात १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३, अमळनेर, यावल व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी २ जण तर पाचोरा, चोपडा, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.