जळगाव - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना महिलांविषयी आक्षेपार्ह शब्द प्रयोग केला होता. या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्तींनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा आहेर घातला.
बांगड्या म्हणजे महिलांचे एक आभूषण आहे. या आभूषणाचा देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने अपमान करणे योग्य नाही. या बांगड्या सावित्रीबाई फुलेंनी घातल्या आणि शिक्षणाची गंगा आली. तारा राणींनी घातल्यावर त्या लढल्या. राजमाता जिजाऊ यांनी घातल्या आणि शिवबाला जन्म दिला. त्यामुळे बांगड्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महिलांविषयी बोलताना फडणवीसांनी सबुरीने बोलावे, असा खणखणीत इशारा यावेळी सुप्रिया सुळेंनी यावेळी दिला.
हेही वाचा - सुप्रिया सुळे झाल्या वृत्त निवेदिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिली बातमी
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भराव्यात, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी जळगावात पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. बांगड्या म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण नाही तर ते कणखरपणाचे प्रतीक आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हेतूपुरस्सरपणे असे वक्तव्य करत महिलावर्गाच्या भावना दुखावल्या आहेत. याच गोष्टीचा आंदोलकांनी निषेध नोंदवला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी फडणवीस यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा आहेर घालत बांगड्यांचा सन्मान केला.