जळगाव - जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची कर्मचारी भरती प्रक्रिया ही राज्य सरकारच्या निर्देशानुसार ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र, अजूनपर्यंत भरतीच झालेली नाही तर या प्रक्रियेत गैरव्यवहार कसला होणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
दूध संघाच्या काळजीवाहू संचालक मंडळाने 163 जागांसाठी सुरू केलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करत 'जस्टीस फॉर पिपल्स' संस्थेचे नागराज पाटील 63 कर्मचाऱ्यांच्या यादीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पाटील यांनी केलेल्या आरोपाचे एकनाथ खडसे यांनी खंडन केले आहे
...तर मला मार्गदर्शन करावे
खडसे म्हणाले, दूध उत्पादक संघाच्या एका बडतर्फ कर्मचाऱ्याने गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. अद्याप दूध संघासाठी कर्मचारी भरती झालेली नाही. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन भरती प्रक्रियेत कुणाला काही गडबड करता येत असेल तर त्याने मला मार्गदर्शन करावे, असा टोलाही खडसे यांनी आरोपासंदर्भात बोलताना लगावला.
जिल्हा बँकेच्या धर्तीवर होणार भरती
जळगाव जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया ऑनलाइन पार पडली. त्यात 250 जागा आताच भरण्यात आल्या. त्याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही. दूध उत्पादक संघाची भरती देखील त्याच धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. दूध संघामध्ये गेल्या 5 ते 10 वर्षांपासून काम करत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना या भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावे, असे संचालक मंडळाचे धोरण आहे. त्यामुळे स्वाभाविकच जे या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या अनुभवानुसार त्यांना सामावून घेण्यासाठी 30 मार्क ठेवले आहेत. त्यापैकी त्यांना 20 मार्क देण्यात येतील. उर्वरित 10 मार्क कागदपत्रांचे आहेत. पण, त्यासाठी ऑनलाइन परिक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यास त्यांना सेवेत घेता येईल. अन्यथा घेता येणार नाही. ज्या 63 कर्मचाऱ्यांनी यादी यांनी दाखविली आहे. ते कर्मचारी आधीपासून तेथेच काम करत आहेत. त्यांच्यामधूनच काही जणांना घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राज्य सरकारच्या परवानगीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुणालाही यात पैसे मागितले जात असतील तर त्यांनी पोलिसांत जावे. कुणीही आर्थिक व्यवहार करु नये, असे आवाहन देखील खडसे यांनी केले.
हेही वाचा - चंद्रकांत पाटील कधीही ठाम नसतात, त्यांची मते दररोज बदलतात -एकनाथ खडसे यांनी काढला चिमटा