एकनाथ खडसेंच्या चिंतेत पडली भर; पुन्हा कोरोनाची लागण ? - एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खडसेंना कोरोनाची लागण झाल्याबाबत जळगाव जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. यापूर्वीही मागील महिन्यात खडसे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. खडसेंना कोरोनाची लागण झाल्याबाबत जळगाव जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. यापूर्वीही मागील महिन्यात खडसे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.
एकनाथ खडसे यांना भोसरीतील भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यासाठी खडसेंना 30 डिसेंबर रोजी मुंबईत चौकशीला हजर व्हायचे होते. परंतु, कोरोनाची लक्षणे असल्याने खडसेंना सक्तवसुली संचालनालयाकडून 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, खडसे आता मुंबईत आहेत किंवा मुक्ताईनगरात? याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. खडसे कुटुंबीयांकडून देखील तशी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
खडसेंच्या चिंतेत पडली भर -
भोसरीतील भूखंड व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीची टांगती तलवार असतानाच खडसेंना आता कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात असल्याने त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
आधीही झाली होती लागण -
याआधी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी काही दिवसांत त्यांना कोरोनाचा धोका पोहोचला होता. 19 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पुढच्या काही दिवसांत त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
काय होते भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण?
2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना उकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 30 मे 2016 ला तक्रार दाखल केली होती. गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चौकशीनंतर एप्रिल 2018च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला, ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचे नुकसानही झाले नाही, असे लाचलुचपत विभागाने त्या अहवालात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.