जळगाव - 'माझ्या हितचिंतकांनीच मी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा जनमाणसात उभी केली. असे असले तरी मी त्यांना आज शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे, मी कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवशी विरोधकांवर निशाणा साधला. आज (2 सप्टेंबर) एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थक त्यांच्या फार्महाऊसवर गर्दी करत आहेत. शुभेच्छांचा स्वीकार करतना खडसे माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले खडसे..?
खडसे म्हणाले, सर्वसामान्य मतदार हा विकास पाहून मतदान करतो. मुक्ताईनगर मतदारसंघात मी गेल्या 40 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. हे करत असताना केवळ मुक्ताईनगर नव्हे, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज मी कोणत्याही पदावर नसलो तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अलीकडे मी पाहतो आहे. माझी ईडी किंवा अन्य प्रकारे जी छळवणूक चाललेली आहे, मला त्रास देण्याचे काम चालू आहे, ते चुकीचे आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये 40 वर्षांत माझ्यावर एकही आक्षेप माझ्यावर नव्हता. असे असताना आता अशा प्रकारे अचानक वादळ उठणे, मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणे, नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात उभी करण्याचे काम चालले आहे. हे काम माझे हितचिंतकच करत आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. मी कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही चूक केलेली नाही. या सर्व प्रकरणातून मी जनतेच्या आशीर्वादामुळे निश्चितच बाहेर पडेल, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही लगावला टोला
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीमुळे राज्य सरकारला अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागेल, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी खडसेंना विचारणा केली असता ते म्हणाले, आपल्या पक्षाचे सरकार असताना सुधीर मुनगंटीवार यांनी कधी खर्चाचा हिशोब काढला नाही. दुसऱ्या पक्षाचे सरकार आले की मात्र, लगेच खर्चाचा हिशेब काढायचा. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70 वर्षे झाली. महाराष्ट्राची निर्मिती होऊन जवळपास 60 वर्षे झाली. या काळात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती करण्यात आलेले आहे. अगदी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होते, त्यावेळीही नियुक्ती झालेली आहे. सेना-भाजपचे सरकार होते त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी कधी असा विरोध केला नव्हता. आपले सरकार असताना विरोध करायचा नाही. बाकी दुसऱ्याचे सरकार आले की विरोध करायचा; मुनगंटीवार यांच्याकडून तरी ही अपेक्षा नाही, असा टोला खडसे यांनी लावला.
मुक्ताईचरणी जिल्ह्याच्या विकासाचे साकडे
आपल्या वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताई चरणी जळगाव जिल्ह्याच्या विकासाचे साकडे घातले. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, जिल्ह्यात शांतता व सुबत्ता नांदावी, अशी आपण आजच्या दिवशी मुक्ताईला प्रार्थना करत असल्याचेही खडसे म्हणाले.
हेही वाचा - घर-दार सर्वस्व हिरावलं, फक्त अंगावरचे कपडे उरले! जगावं कसं? डोंगरी नदी पूरग्रस्त बागुल कुटुंबाला भावना अनावर