जळगाव - केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रस्त्यावर चूल पेटवा आंदोलन करून भाकरी भाजल्या. तसेच गॅस दरवाढ लगेच मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पंतप्रधानांनी आश्वासन पाळले नाही-
गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर 700 रुपयांच्या घरात गेले आहेत. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आम्ही या दरवाढीचा निषेध करत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.
दरवाढ कमी न झाल्यास तीव्र आंदोलन -
केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवायला हवे. या दरवाढीने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात काहीच करत नाही. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलक महिलांकडून देण्यात आला.
हेही वाचा - पाकिस्तानातून परतलेल्या गीता कुटुंबाच्या शोधात सोमवारी परभणीत