जळगाव - भाजपने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 अ हटविण्याचा घेतलेला निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अभूतपूर्व निर्णय होता. ज्या निर्णयाविषयी आधी विचार करणे देखील अशक्य वाटायचे, तो निर्णय भाजपने घेतला. मात्र, राष्ट्रहिताचा असलेल्या या निर्णयाबद्दल काही राजकीय पक्ष व नेते राजकारण करत आहेत. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि कलम 35 अ परत लागू करण्याचा उल्लेख करावा, असे खुले आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिले.
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा रविवारी दुपारी जळगावात पार पडली. या सभेत मोदी बोलत होते. यावेळी मोदींनी केंद्र व राज्य सरकारची वाटचाल, कलम 370, कलम 35 अ, तिहेरी तलाक, भारताची जगातील प्रतिमा या मुद्द्यांवर मते मांडताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, सुरतचे खासदार सी. आर. पाटील, आमदार चंदू पटेल यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार उपस्थित होते.
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत जळगावकरांची मने जिंकून घेतली. ते पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना मूलभूत सुविधा देखील मिळत नव्हत्या. त्यांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. तेथे फक्त दहशतवादाचा विस्तार सुरू होता. मात्र, आम्ही कलम 370 आणि कलम 35 अ हटवून तेथील स्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले. जम्मू आणि काश्मीर फक्त जमिनीचा तुकडा नाही तर आपल्या भारत देशाचे मस्तक आहे. तेथील मातीचा प्रत्येक कण भारताचे विचार आणि शक्तीला मजबूत करतो. जम्मू-काश्मीरमध्ये 40 वर्षांपासून असलेल्या असामान्य परिस्थितीला सामान्य करण्यासाठी 4 महिने पण लागणार नाहीत. जम्मू आणि काश्मीरला विकासाच्या वाटेवर आणू, असा विश्वास देखील मोदींनी दिला.
राष्ट्रहिताचा असलेल्या या निर्णयाबद्दल काही राजकीय पक्ष व नेते राजकारण करत आहेत. या विषयावर राजकारण करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता तुमच्याकडे मतांसाठी येत आहेत. जम्मू आणि काश्मीरविषयी देश जो विचार करतो, त्या उलट हे विरोधक विचार करतात. पण यांनी खोटे अश्रू ढाळणे बंद करावे. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि कलम 35 अ परत लागू करण्याचा उल्लेख करावा, असे आव्हानच मोदींनी दिले.
देशवासीयांच्या समर्पणामुळे जगात उंचावली भारताची प्रतिमा-
चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशवासीयांनी एनडीए सरकारवर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला सेवेची संधी मिळाली. नव्या भारताच्या निर्माणासाठी तुम्ही आम्हाला जो कौल दिला, त्याचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. जगात भारताची प्रतिमा माझ्यामुळे नाही तर देशवासीयांच्या समर्पणामुळे उंचावली आहे. नव्या भारताचा जोश सारे जग पाहत आहे. देशातील 130 कोटी जनतेमुळे जगात भारतीय लोकशाहीचा गौरव होत आहे. जनतेने दिलेल्या जनादेशामुळे भारताच्या प्रतिभेला बळ मिळाले. म्हणून जगातील प्रत्येक देश आज भारतासोबत यायला तयार आहे. नवा भारत आज कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची धमक ठेवतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.
तिहेरी तलाक कायद्याला मुस्लिमांचाही पाठिंबाच-
आम्ही बहुमताने सत्तेत आलो तर तिहेरी तलाक कायदा करू, असे आश्वासन आम्ही मुस्लिम समाजातील जनतेला दिले होते. त्यानुसार आम्ही हा कायदा केला. पण त्याला काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विरोध करत त्याच्या मार्गात अडथळे आणले. पण आम्ही दिलेले आश्वासन पाळले. विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हा कायदा मोडीत काढण्याची घोषणाही आपल्या जाहीरनाम्यात करावी. आज मुस्लिम समाजातील पुरुष पतीच्या नात्याने नाही तर पिता आणि भावाच्या नात्याने या कायद्याचे समर्थन करतात. देशाला अजून दुसरे काय हवे, असेही मोदींनी सांगितले.
युतीचे नेतृत्त्व कर्मशील आणि ऊर्जावान-
थकलेले नेते एकमेकांना आसरा देऊ शकतात. पण राज्याची स्थिती बदलू शकत नाहीत, किवा युवकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. आमचे नेते बघा, प्रत्येक जण नव्या दमाचा, नव्या जोमाचा आहे. युतीचे नेतृत्त्व कर्मशील आणि प्रचंड ऊर्जावान आहे. विरोधकांचे नेते स्वतःचा पक्ष मोठा करू शकत नाही ते तुम्हाला काय मोठे करतील, असे सांगत मोदींनी शरद पवारांना चिमटा काढला. गेल्या पाच वर्षात भाजपने स्थिर, स्वच्छ, सशक्त, संवेदनशील तसेच सर्वांना साथ, सर्वांचा विकास असे सरकार दिले. यापुढेही असे सरकार हवे असेल तर युतीला कौल द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मोदींनी दिली ही प्रमुख आश्वासने-
साडेतीन लाख कोटी खर्चून प्रस्तावित असणाऱ्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घराला पाण्याने जोडणार, गेल्या पाच वर्षात देशातील 10 लाख गरिबांना हक्काचे घर मिळाले, त्याचप्रमाणे 2022 पर्यंत देशातील अजून 10 लाख गरिबांना हक्काचे पक्के घर देणार, फक्त शेतीसाठी नाही तर उद्योगांसाठीही पाण्याची व्यवस्था करणार, आधारकार्डमध्ये नावात, पत्त्यात चूक असलेल्या लाभार्थ्यांना देखील शासकीय योजनांचा लाभ देणार, अशी आश्वासने मोदींनी यावेळी दिली.
शरद पवारांची विवेकबुद्धी हरवलीय- देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा पवारांना लक्ष्य केले. शरद पवारांची स्थिती आज खूप वाईट आहे. 'आधे इधर, आधे उधर, और बचे हुये मेरे पिछे', अशी पवारांची स्थिती झाली आहे. इतके वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणारे, राष्ट्रीय नेते असलेले शरद पवारांना पराभव दिसायला लागल्याने त्यांची विवेकबुद्धी हरवली आहे म्हणून ते कशाप्रकारे बोलत आहेत, हातवारे करत आहेत, हे आपण पाहत आहोत. आम्ही नटरंग सारखे काम करत नाहीत म्हणून आम्हाला हातवारे करता येत नाहीत. हातवारे करणे पवारांना शोभत नाही. खरा पैलवान कोण आहे, हे जनता येत्या 24 तारखेला दाखवून देईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी यावेळी पवारांना लक्ष्य केले. काँग्रेसची अवस्था देखील वाईट आहे. आपले काही खरे नाही, हे राहुल गांधींना कळाल्याने ते प्रचारापूर्वीच पळून गेले. पण कार्यकर्त्यांनी गळ घातल्यानंतर ते आता परतले आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.