जळगाव - शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात एका मध्यमवयीन दाम्पत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी दोरीने गळा आवळून दोघांचा खून केल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. मृत दाम्पत्याच्या मुलीने फोन केल्यानंतर दोघांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी तिने नातेवाईकांना घरी चौकशीसाठी पाठवल्यानंतर आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास ही घटना उगडकीस आली आहे.
गेल्याच वर्षी नवीन घरात रहायला आले होते
मुरलीधर राजाराम पाटील (वय 54) आणि आशाबाई मुरलीधर पाटील (वय 47) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. पाटील दाम्पत्य हे कुसुंबा गावातील ओमसाई नगरात वास्तव्याला होते. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात स्वमालकीच्या नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते याठिकाणी राहायला आलेले होते. यापूर्वी ते कुसुंबा गावातच दुसरीकडे वास्तव्याला होते. मुरलीधर पाटील हे जळगावातील दिलीप कांबळे नामक एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होते.
नेमकं काय घडलं?
पाटील दाम्पत्याला स्वाती व शीतल नामक दोन मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. दोघी मुली विवाहित आहेत. त्यापैकी स्वाती हिचे सासर हे यावल तालुक्यातील सावखेडा तर शीतलचे चोपडा तालुक्यातील वेले हे आहे. बुधवारी सायंकाळी शीतलने आई आशाबाई यांना नेहमीप्रमाणे फोन केला होता. तेव्हा दोघींमध्ये कौटुंबीक चर्चा झाली होती. त्यानंतर पुन्हा रात्री साडेआठ वाजता शीतलने आईला फोन केला. पण आईचा फोन लागला नाही, म्हणून तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी देखील फोन घेतला नाही. कदाचित रात्र झाल्याने दोघे झोपले असतील म्हणून तिने नंतर फोन केला नाही. त्यानंतर शीतलने आज (गुरुवारी) दुपारी पुन्हा आईला फोन केला. पण फोन लागला नाही. वडिलांनी देखील फोन घेतला नाही. त्यामुळे शीतलने तिची आजी रखुमाबाईला फोन केला. तेव्हा रखुमाबाई यांनी मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील यांना फोन करून शीतलसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नंतर रखुमाबाई व संतोष पाटील हे दोघे जण पाटील कुटुंबीयांच्या घरी गेले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. घरात गेल्यावर दोघांना धक्का बसला. दुमजली घराच्या खालच्या मजल्यावरील शेवटच्या खोलीत आशाबाई मृतावस्थेत पडल्या होत्या. गळा आवळून त्यांचा खून झाल्याचे दिसून आले. नंतर ते वरच्या मजल्यावर गेले. तेथे बाहेर गच्चीच्या एका कोपऱ्यात मुरलीधर पाटील हे देखील मृतावस्थेत पडलेले होते. त्यांचाही दोरीने गळा आवळलेला होता. या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ मुलगी शीतलला दिली. ग्रामस्थांना घटनेची माहिती झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना घटना कळवण्यात आली. पोलीस लागलीच फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांचे तसेच परिसरातील लोकांचे जबाब नोंदवले आहेत.
चोरीचा संशय
या घटनेनंतर कुसुंबा येथे आलेली पाटील दाम्पत्याची मुलगी शीतल हिने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई आशाबाई यांच्या अंगावर दागिने नव्हते. तसेच घरातील दोन कपाटे उघडे होते. त्यातून ऐवज चोरीला गेला असावा, असे ती सांगत होती. पण घरात पाटील दाम्पत्य व्यतिरिक्त दुसरे कुणीही राहत नसल्याने नेमका कितीचा ऐवज आणि काय-काय वस्तू चोरीला गेल्या, हे समजलेले नाही. परंतु, पोलिसांनी याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
गेल्या वर्षी पाटील दाम्पत्याकडे झाली होती चोरी
गेल्या वर्षी पाटील दाम्पत्य हे कुसुंब्यात दुसरीकडे राहत होते. त्यावेळी त्यांच्या घरी एका मुलाने चोरी केली होती. त्या मुलाने आशाबाई यांचे मंगळसूत्र आणि 40 हजार रुपये रोख असा ऐवज चोरला होता. या घटनेनंतर त्या मुलाने पाटील दाम्पत्याला त्रासही दिला होता, अशी माहिती शीतलने पत्रकारांशी बोलताना दिली. शीतलने त्या मुलाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करत आहेत.
हेही वाचा - प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन