जळगाव - मनपा पालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील २ हजारांहून अधिक गाळेधारकांना महापालिकेने नुकसान भरपाईच्या नोटीसा बजाविल्या आहेत. या विरोधात अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी आंदोलनाची तयारी केली असून, या आंदोलनाच्या नियोजनासाठी रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे.
मुदत संपूनही गाळ्यांचा व्यावसायिक वापर करत असल्याचा ठपका गाळेधारकांवर ठेवण्यात आला आहे. मनपाने गाळेधारकांना नुकसानभरपाईच्या नोटिसा बजावत 15 दिवसांच्या आत ही रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. मार्केटमधील संघटनांच्या बैठका होत असून, अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांचा भाडे प्रश्न मार्गी लावला नाही तर थेट आंदोलनाचा इशारा गाळेधारकांनी दिला आहे. तसेच ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली आहे, अशा गाळेधारकांवर गाळे नुतनीकरणाचा प्रस्ताव देखील आणू नये अशी भूमिका अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी घेतली आहे.
धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांचा 25 तारखेपासून आंदोलनाचा इशारा -
शहरातील मुदत संपलेल्या मार्केटच्या जुन्या भाड्याचा प्रश्न मार्गी लावूनच नुतनीकरणाबाबत विचार करावा. या प्रमुख मागणीसाठी येथील धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारक २५ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
इतर मार्केटमधील गाळेधारकांचा मिळू शकतो पाठिंबा -
सर्वच मार्केटमधील नुकसानभरपाईच्या नोटिसा दिल्यामुळे इतर मार्केटमधील गाळेधारक देखील नाराज आहेत. या आंदोलनाल इतरांचा देखील पाठिंबा मिळू शकतो. यासाठी रविवारी इतर मार्केटमधील गाळेधारकांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
या आहेत मागण्या -
गाळेकरार नुतनीकरण विषयाआधी मार्केटचे जुने भाडे प्रश्न अगोदर सोडवा. जोपर्यंत भाडे कचाट्यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत नुतनीकरण विषय करणे गाळेधारकांसाठी घातक आहे असे गाळेधारकांचे म्हणणे आहे. जिझिया करालाही लाजवेल असे लाखो रुपयांच्या नुकसान भरपाईची एकत्र ७ वर्षांचे सुमारे २० लाखांची बिले मनपाने गाळेधारकांना दिली आहेत. जाचक धोरणांमुळे गाळेधारक देशोधडीला लागणार असून यावर फेरविचार करण्याची मागणी गाळेधारकांची आहे.