जळगाव - मी भाजपत आहे आणि भाजपतच राहणार आहे. माझ्या राजकीय भूमिकेबाबत अनेक कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहेत. या शंका येणे साहजिकच आहे. मात्र, शंकांचे निरसन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मुक्ताईनगरसह संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपमय करून दाखवू, असा निर्धार खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी पार पडलेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत केला. त्यामुळे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांना घरातूनच आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान बुथ संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी जळगावातील ब्राम्हण सभेत भाजपकडून जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार संजय सावकारे, चंदू पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुनेचे सासऱ्यांना आव्हान-
या बैठकीत मनोगत मांडताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असून, या निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघात भाजपचाच डंका वाजणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन रक्षा खडसे यांनी केले. दरम्यान, भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांना आपले राजकीय अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. तर खासदार रक्षा खडसे यांनाही आपले वर्चस्व सिद्ध करण्याठी या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवून द्यावे लागणार आहे. त्यातच रक्षा खडसे यांनी आगामी निवडणुकांसाठी निर्धार केल्याने त्यांनी एकप्रकारे एकनाथ खडसे यांनाच आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.
केंद्राच्या योजनांचे श्रेय घेताहेत पालकमंत्री - उन्मेष पाटील
केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असून, त्या योजना जनतेपर्यंत पोहचत असताना या योजना केंद्राच्या आहेत. याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्याची गरज आहे. कारण, जलजीवन मिशनसारख्या योजनांचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे घेत असल्याचा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी केला. तसेच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांबाबत देखील खासदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन केले.
बड्या पदाधिकाऱ्यांवर राहणार नजर- सुरेश भोळे
अनेक पदाधिकारी पक्षाच्या आंदोलनांकडे पाठ फिरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यकर्ते आंदोलनात मनापासून सहभागी होत असताना गुन्हे दाखल होतील या भीतीने पदाधिकारी आंदोलनात येत नसून, आता पुढे या पदाधिकाऱ्यांवर पक्षाची नजर असणार आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका जहालपणे मांडण्याची गरज असल्याचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सांगितले. या मेळाव्यात तालुका प्रमुखांकडून ग्रामपंचायत निवडणुकांचा देखील आढावा घेण्यात आला.