जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी षडयंत्र रचून आपला घात केला. माझ्या हितचिंतकांना सोबत घेऊन त्यांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार ए. टी. पाटील यांनी मंगळवारी पारोळा येथे झालेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या सभेत केला. गेल्या निवडणुकीत माजीमंत्री एकनाथ खडसे हे आपले गॉडफादर होते. मात्र, या निवडणुकीत आपला कुणीच गॉडफादर नसल्याने आपले तिकीट कापले गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
खासदार पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी ही खेळी रचली होती. ‘कुंपणानेच शेत खाल्ले, दाद मागावी कुणाकडे’ अशी आपली गत झाली. पक्षाकडे देखील या लोकांनी माझी बदनामी केली. दोन वेळा सर्वेक्षण झाले. त्यावेळी आपले नाव आघाडीवर होते. त्यानंतर मात्र, आपल्या सामाजिक बदनामीचा डाव जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी रचला.
पार्लमेंटरी बोर्ड व संघ आपल्या पाठीशी उभा होता. तरीदेखील माझे तिकीट कापले गेले याचे वाईट वाटले. मी जर चुकीचे वागलो असेल, तर मला भर चौकात फाशी द्या. पण अशी बदनामी करू नका, असे आवाहन त्यांनी केले. जळगाव मतदारसंघातील चुकीच्या उमेदवारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या अकाऊंटवर तरुणांनी ट्वीट करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. मोदी व शाह यांच्याकडूनच आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.