जळगाव - भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ऐन पेरणीच्या काळात महावितरण कंपनीकडून कृषी पंपांच्या वीजबिलांची शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली सुरू आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात आमदार किशोर पाटील यांनी आज (सोमवारी) आक्रमक भूमिका घेत महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. शेतकऱ्यांना त्रास देणे महावितरण कंपनीने बंद केले नाही, तर यापुढे शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने वीजबिलप्रश्नी आक्रमक होऊन आंदोलन केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले टाळे -
महावितरण कंपनीकडून सध्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सक्तीने कृषी पंपांच्या वीजबिलांची वसुली सुरू आहे. यामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. आधीच शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत होत नाही. जळालेले विद्युत रोहीत्र बदलून दिले जात नाहीत, अशातच आता वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कंपनीने सक्तीने वीजबिल वसुली न करता शेतकऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली होती. परंतु, तरीही वीज बिल वसुलीचा प्रकार सुरूच असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनप्रसंगी आमदार पाटील यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
महावितरणची मनमानी सुरू असल्याचा केला आरोप -
कृषी पंपांच्या वीजबिलांच्या वसुलीसंदर्भात राज्य सरकारने सवलत योजना जाहीर केली आहे. यात शेतकऱ्यांना थकीत वीजबिल, व्याजाची परतफेड करण्यासाठी 2024 पर्यंतची टप्प्याटप्प्याने मुदत देण्यात आहे. मात्र, असे असताना महावितरण कंपनी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे, असा आरोप यावेळी आमदार किशोर पाटील यांनी केला. दरम्यान, महावितरण कंपनीने अडवणुकीचे धोरण मागे घेतले नाही, तर महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आता पेरणीचा काळ, वसुली नकोच -
सध्या खरीप हंगामाचा पेरणीचा काळ सुरू आहे. शेतकरी व्याजाने पैसे काढून, दागदागिने विकून बी-बियाणे व खते खरेदी करत असतो. मात्र, अशा परिस्थितीत कृषी पंपांच्या वीज बिलांची वसुली करू नये, अशी मागणीही आमदार किशोर पाटील यांनी केली आहे. भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलन केल्याने आमदार किशोर पाटील यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.