जळगाव - ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत आले पाहिजे. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी आज दुपारी बोलत होते.
आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राजकारणावर होणारे दूरगामी परिणाम, पंकजा मुंडे, बिहार निवडणूक अशा विषयांवर मते मांडली. आमदार गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबीक संबंध राहिले आहेत. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप-सेनेत युती घडवून आणली होती. आता, प्रीतम मुंडे लोकसभेला भाजपच्या उमेदवार असताना शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही आणि नसतानाही शिवसेनेने नेहमी कुटुंबाचे नाते जोपासले आहे, याची आठवण पाटील यांनी करून दिली. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत आले पाहिजे. म्हणजे राजकारणात मजा येईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
कोरोनाची लस देणे, हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही-
भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपची सत्ता आली तर नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यावर गुलाबराव पाटील यांनी टीका केली. कोरोनाची लस देणे हा राजकीय मुद्दा असू शकत नाही. कोरोना गेल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. पुढे ते म्हणाले, की त्यामुळे लस दिली अथवा नाही याचा फरक पडणार नाही. कोरोनाची लस दिल्यानंतरही माणूस जिवंत राहील का, याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजपने कोरोनाची लस देण्याऐवजी बिहारमधील बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या संदर्भात बोलायला हवे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
सुडाचे राजकारण नकोच-
एकनाथ खडसे यांच्या बाबतीत ते सुडाचे राजकारण करत असल्याची टीका होते. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, याबाबत मला काहीही बोलता येणार नाही. पण सुडाचे राजकारण करायला नकोच. आयुष्य खूप छोटे आहे. त्यामुळे शक्य तेवढी दुश्मनी घेणे टाळले पाहिजे, अशी भावनिक प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.