जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे काकाच्या लग्नाला आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मुलीचे हातपाय बांधून आणि तोंडाला रुमाल बांधून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला जळगावातून ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - रात्रीच्या संचारबंदीला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट
मध्यप्रदेशातील नेपानगर येथील मुलगी ही भावाच्या लग्नानिमित्त कुटुंबासह उचंदा या गावी आली होती. ती आई-वडिलांसोबत तीन दिवसांपासून मुक्कामी होती. याच लग्नासाठी चेतन सुतार (वय २०) हा देखील आपल्या आईसोबत आलेला होता. चेतन मुलीवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, मुलगी घराजवळील गिरणीत राहिलेली तिची चप्पल घेण्यासाठी गेली होती. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत चेतनने गिरणीचा दरवाजा बंद केला व तिचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला.
गिरणीत पत्र्यांचा आवाज झाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळ गाठल्यावर हा प्रकार उघड झाला होता. यानंतर चेतन पसार झाला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून चेतन विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संपूर्ण परिसर काढला पिंजून
चेतन हा जळगाव शहरातील तांबापुरा झोपडपट्टीत लपल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, विजय बावस्कर, किशोर पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत संशयीताला अटक केली.
हेही वाचा - कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे जळगावात वाढतोय कोरोना; एकमेव प्रयोगशाळेवर चाचण्यांची मदार