जळगाव - शहरातील निमखेडी शिवारातील दिव्यजोती वाटिकाश्रम परिसरात राहणारा एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला आहे. हा मुलगा कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. घरातून निघून जाण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी घरातून स्वखुशीने पश्चिम बंगालमध्ये जात आहे. मी गेल्यानंतर माझी शोधाशोध करू नका, रडूही नका. मी २०२८ मध्ये परत येईन' असा मजकूर त्याने चिठ्ठीत लिहिला आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता झालेला मुलगा शहरातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे. तो 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेदरम्यान घरातील कोणाला काहीही न सांगता घराबाहेर पडला. तो सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारची माहिती देत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात सापडली चिठ्ठी -
घरातून निघून जाण्यापूर्वी त्या मुलाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी घरातून स्वखुशीने पश्चिम बंगालमध्ये जात आहे. अभ्यासाच्या टेन्शनमुळे मी घरातून जात नाहीये. मी गेल्यानंतर माझी शोधाशोध करू नका, रडूही नका. मी २०२८ मध्ये परत येईन' असा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला आहे. ही चिठ्ठी तपासकामी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोबाईलमधील सिमकार्ड ठेवले काढून -
बेपत्ता झालेल्या मुलाने त्याच्याकडील मोबाईलमधील दोन्ही सिमकार्ड काढून घरातच ठेवले आहेत. सिमकार्ड विना असलेला मोबाईल मात्र तो आपल्या सोबत घेऊन गेला आहे. आपण मोबाईलमधील सिमकार्ड काढून ठेवत असल्याचा उल्लेखही त्याने चिठ्ठीत केला आहे.
कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा आहे संशय -
त्या मुलाला कुणीतरी काही आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यास कुणी पळवून नेले, याची माहिती समोर आलेली नाही. त्याच्या कुटुंबीयांनी कुणावर संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा - पंजाबमधील दोघांना 7 गावठी पिस्तुलासह अटक, चोपडा पोलिसांची कारवाई
हेही वाचा - 'बीएचआर'च्या मालमत्ता गिरीश महाजनांनी लाटल्या, २५ कोटींच्या संपत्तीची दीड कोटीत खरेदी'