जळगाव - कोणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचे आहे. या गोष्टीचे कुणीही समर्थन करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार खचावे, म्हणून भाजपकडून निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत. फोन टॅपिंग हा त्यातलाच एक भाग आहे. मात्र, आमचे सरकार खरणार नाही. 5 वर्षे काम करतच राहील, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात भाजपवर निशाणा साधला.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी गुलाबराव पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा - ''फोन टॅपिंगचे कोणतेही आदेश दिलेले नव्हते, सरकारने चौकशी करावी''
फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, गेल्या काळातही फोन टॅपिंगचे असे प्रकार घडले आहेत. ही एक प्रकारची रणनीती असते. मात्र, कुणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचेच आहे. हा प्रकार करण्यामागे कोण आहे, हे लवकरच समोर येईल, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली, राष्ट्रवादी आक्रमक
सुरक्षा काढून फरक पडत नाही -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे, याबाबत विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले, शरद पवारांची सुरक्षा व्यवस्था काढणे योग्य नाही. त्यांचीच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढायला नको. यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती. मात्र, त्याने काही फरक पडत नाही. शरद पवारांची सुरक्षा काढली असली तरी त्यांच्या मागे जनता आहे, जनतेचे आशीर्वाद आहेत. मग त्यांना सुरक्षा असली काय अन नसली काय, फरक पडणार नाही, असे मतही त्यांनी मांडले.