जळगाव - कोरोनामुळे राज्यभर लाॅकडाऊन करण्यात आला आहे. याचा परिणाम छोट्या व्यवसायावरही झाला आहे.लॉकडाऊनमुळे चहाच्या टपऱ्या आणि हाॅटेलमधील दुधाचा वापर थांबला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात तब्बल १ लाख लिटर दुधाची विक्री घटली आहे. जिल्हा दूध संघाने अतिरिक्त दुधापासून दूध पावडर बनवण्यास प्रारंभ केला असून, दरराेज २५ टन पावडरची निर्मिती हाेत आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाकडे दरराेज ३ लाख ४० हजार लिटर दुधाचे संकलन हाेते. यापैकी जवळपास २ लाख लिटर दुधाची विक्री हाेते. मात्र, लाॅकडाऊनच्या काळात ही विक्री १ लाख ते १ लाख १० हजार लिटरपर्यंत आली आहे. या काळात मुंबईतील महानंद दूध संघ जळगाव जिल्हा दूध संघाकडून १० हजार लिटर दुधाची खरेदी करत आहे. त्यामुळे दरराेज केवळ एकूण १ लाख २० हजार लिटर दुधाचीच विक्री हाेत असून, उर्वरित दूध अतिरिक्त राहत आहे. शासनाने दूध संघाला स्वत:च्या वाहतूक खर्चासह दरराेज ७० हजार लिटर दूध खरेदीची तयारी दर्शवली आहे.
वाहतुकीचा प्रश्न साेडवल्याने दोन दिवसांपासून दूध वितरण सुरू झाले आहे. दरराेज २० ते २५ टन दूध पावडरची निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांकडून दूध संकलन पूर्ववत कायम सुरु असल्याचे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनाेज लिमये यांनी सांगितले.